बोर्डीत उद्या श्री नागास्वामी महाराज यात्रा हजारो भाविकांची उपस्थिती,पोलिसांचा तगडा बंदोबस्त

बोर्डीत उद्या श्री नागास्वामी महाराज यात्रा**हजारो भाविकांची उपस्थिती,पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खीरकार

अकोटसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी येथील पुरातन श्री नागास्वामी महाराज मंदिरात रोज सायंकाळी हरिपाठ,सामुदायिक प्रार्थना,आरती,मोठ्या भक्तिभावात एक आठवड्या पासून मंदिरात सुरू आहे.उद्या यात्रेनिमित्त सकाळी १२ वाजता मंदिरात आरती,करून दहीहंडी फुटणार आहे.नंतर रथ जागेवरून निघून भजन मंडळ,दिंड्या,डफडेवाले, बँड पथकासह गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक निघणार आहे.तसेच अकोट तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून हजारो भाविक भक्तगण दर्शनासाठी दाखल होणार असून,दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.श्री नागास्वामी महाराज हे बोर्डी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.मंदिराला दीर्घ धार्मिक परंपरा लाभली असून,श्रावण महिन्यातील यात्रेला विशेष महत्त्व आहे.दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने येथे येऊन महाराजांचे दर्शन घेतात.नवसपूर्ती,पूजा-अर्चा,अभिषेक आणि धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी होते.यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची वर्दळ सुरू होते.भाविकांकडून श्री नागास्वामी महाराजांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून पूजा-अर्चा केली जाते.कावडधारी शिवभक्तांकडून पवित्र जल आणून जलाभिषेक करण्याची परंपरा असून,या वेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जातो.श्री नागास्वामी महाराजांच्या यात्रा महोत्सवातील रथयात्रा हा प्रमुख आकर्षणाचा भाग असतो.सजविलेल्या रथातून महाराजांच्या पादुका व प्रतिमेची मिरवणूक काढली जाते.रथयात्रेत ग्रामस्थ,वारकरी,कावडधारी,भजन मंडळे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात.ढोल-ताशे, टाळ-मृदंग आणि जयघोषामुळे गावातील वातावरण भक्तिमय होते.यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता,सजावट आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांना दर्शनासाठी रांगेची व्यवस्था,पिण्याचे पाणी,स्वच्छता तसेच गर्दीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात आले आहे.मंदिर समिती,ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यात्रेच्या व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेत आहेत.नागास्वामी महाराजांची यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून गावातील सामाजिक एकोप्याचे प्रतीक मानली जाते.यात्रेनिमित्त विविध समाजघटक एकत्र येतात.बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ,मुली,ह्या यात्रेसाठी गावात परततात.त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.यात्रेसाठी ग्रामीण पोलिस स्टेशनचे वतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येतो.*बॉक्स*सजवलेला रथांमध्ये महाराजांच्या पादुका ठेऊन,दोरखंडाच्या सहायाने युवा पिढी मोठ्या आनंदात रथ गावातून ओढतात,आपापल्या घराजवळ रथ आला की पूजा करून नारळ फोडल्या जाते.गेली कित्येक वर्षा पासून ही अखंड परंपरा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *