शेतकऱ्याचे प्रतीकात्मक प्रेत अन् त्यावर प्रश्नांचा ढीग; ‘पोटखराब वर्ग (अ)’च्या संभ्रमाविरोधात अनोखे आंदोलन!

शेतकऱ्याचे प्रतीकात्मक प्रेत अन् त्यावर प्रश्नांचा ढीग; ‘पोटखराब वर्ग (अ)’च्या संभ्रमाविरोधात अनोखे आंदोलन!

जळगाव जामोद प्रतिनिधी

महापुरामुळे खरडून गेलेल्या शेतीच्या पंचनाम्यांमध्ये ‘पोटखराब वर्ग (अ)’ तसेच कथित २० आर निकषाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, या मागणीसाठी आज जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान प्रतिकात्मक शेतकऱ्याचे प्रेत ठेवून त्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे फलक लावण्यात आले. महापुराने शेतीचे झालेले नुकसान, पंचनाम्यांबाबत निर्माण झालेला संभ्रम आणि प्रशासनाकडून लेखी स्पष्टीकरण मिळत नसल्याचा निषेध या माध्यमातून करण्यात आला.पंचनामे करताना काही शेतकऱ्यांना “२० आरपेक्षा जास्त क्षेत्र खरडून गेले तर ते ‘पोटखराब वर्ग (अ)’ मध्ये जाईल”, अशी माहिती सांगितली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र महसूल प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत नायब तहसीलदार यांनी असा कोणताही आदेश प्रशासनाने दिलेला नसून ही माहिती अफवा असल्याचे सांगितल्याचा दावा आंदोलकांनी केला.यावर आंदोलकांनी सवाल उपस्थित केला की, जर असा कोणताही आदेश दिलेला नाही, तर पंचनामे करताना शेतकऱ्यांना २० आरचा निकष कोणी सांगितला आणि कोणत्या आधारावर सांगितला? या संपूर्ण प्रकरणाचा लेखी खुलासा करून संबंधित जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.आंदोलकांनी पंचनाम्यांसाठी दिलेल्या लेखी आदेशांच्या प्रमाणित प्रती, संबंधित शासन निर्णय व परिपत्रके, ‘पोटखराब वर्ग (अ)’ संदर्भातील कायदेशीर निकष तसेच २० आर निकषाचा कायदेशीर आधार उपलब्ध करून देण्याची मागणी केली.“तोंडी माहिती नको, लेखी आदेश दाखवा; अफवा असेल तर ती पसरविणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा,” अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.दरम्यान, हा प्रश्न केवळ पूरग्रस्त शेतकऱ्यांचा नसून शेतजमिनीच्या नोंदी, शेतकऱ्यांचे हक्क आणि शेतीच्या भवितव्याशी संबंधित असल्याने संपूर्ण शेतकरी समाजाने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी केले.या आंदोलनाला विजय ठाकरे, प्रा. नितीन घोपे, तुकाराम गटमने, वसंत मिरगे, संजय भुजबळ वासुदेव राजनकर, अनंता बकाल, अशपाक देशमुख, वैभव ठाकरे, निनाजी झाटे, धनंजय पाटील, ज्ञानेश्वर झाटे,राजेंद्र परिहार, श्रीकृष्ण काळे, संजय झाटे, पांडुरंग वानखडे, नितीन कोकाटे, संजय पवार, ज्ञानेश्वर अंभोरे, गोपाल उमरकर, विलास दातीर, अतुल भोपडे आणि मधुकर झाटे यांच्यासह शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.आंदोलकांनी प्रशासनाला तातडीने लेखी खुलासा करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्याची मागणी केली असून, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *