निराधारांना आधार देण्यासाठी योजना की त्रास देण्यासाठी? मनसे तालुकाध्यक्ष नितीश भावारकर यांचा संतप्त सवाल

निराधारांना आधार देण्यासाठी योजना की त्रास देण्यासाठी? मनसे तालुकाध्यक्ष नितीश भावारकर यांचा संतप्त सवाल; मूकबधिर लाभार्थी चार महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या हेलपाट्यात

शेगाव तालुका प्रतिनिधी

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी मागील तब्बल **चार महिन्यांपासून तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या मूकबधिर लाभार्थी सौ. सरला महेश वाघमारे, रा. आदर्श नगर, शेगाव** यांच्या प्रकरणाने शासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसीलदार, शेगाव यांना निवेदन देण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार **श्री. सुरडकर** यांच्याशी चर्चा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सौ. सरला वाघमारे यांची चार महिन्यांपूर्वी नव्याने नोंदणी करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये **आधार क्रमांक चुकीचा अपलोड झाल्यामुळे बुलढाणा येथील संबंधित अधिकाऱ्यांनी सदर नोंदणी Reject केली.** विशेष म्हणजे चुकीची माहिती दुरुस्त अथवा Edit करण्याचा पर्याय **MahaDBT पोर्टलवर उपलब्ध नसल्याचे** प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची वेळ लाभार्थीवर आली असून, वेबसाईट कधी सुरू तर कधी बंद असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे समोर आले आहे.सर्वात गंभीर बाब म्हणजे **मूकबधिर असलेले संबंधित लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून दररोज सकाळी तहसील कार्यालयात येऊन बसतात आणि वेबसाईट सुरू होण्याची वाट पाहतात.** स्वतःची समस्या व्यवस्थितपणे मांडताही न येणाऱ्या या व्यक्तीला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी चार महिन्यांपासून करावी लागत असलेली धडपड ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे **शेगाव तालुका अध्यक्ष नितीश भावारकर** यांनी संतप्त सवाल उपस्थित केला की, **“निराधारांना आधार देण्यासाठी शासनाच्या योजना आहेत की त्यांना त्रास देण्यासाठी? लाखो रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचित एका गरीब व्यक्तीसाठी मिळणारे हजार रुपये किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव उरलेली नाही.”**शासनाच्या कल्याणकारी योजना कागदावर राहण्यापेक्षा त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. विशेषतः **ज्या व्यक्तींना स्वतःचे मत किंवा समस्या व्यक्त करता येत नाही, तसेच दिव्यांगत्वामुळे शासकीय कार्यालयात वारंवार ये-जा करणे कठीण आहे**, अशा व्यक्तींसाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि मानवी दृष्टिकोनातून काम करणे अपेक्षित आहे. एका चुकीच्या आधार क्रमांकामुळे नोंदणी Reject होणे, ती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध नसणे आणि पुन्हा नोंदणीसाठी चार महिने लाभार्थ्याला हेलपाटे मारावे लागणे, हा प्रकार **शासनाच्या कार्यपद्धतीवर आणि सुविचारांवरच प्रश्न निर्माण करणारा आहे.**सौ. सरला वाघमारे यांना त्यांच्या हक्काचे अनुदान तातडीने मिळवून द्यावे, तसेच अशा इतर गरजू व दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवताना अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.**सदर निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख व शहर अध्यक्ष परमेश्वर लाहूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.** यावेळी वाहतूक सेना अध्यक्ष **राम इंगळे, विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन नागे, समाधान शेगोकार, देवा चिमणकर** तसेच संबंधित लाभार्थी व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *