नांदुरा नगरपरिषदेच्या ई-निविदेच्या तारखांमध्ये मोठा घोळ निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुदत संपल्याचा प्रकार?

नांदुरा नगरपरिषदेच्या ई-निविदेच्या तारखांमध्ये मोठा घोळ; निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच मुदत संपल्याचा प्रकार?

नांदुरा | प्रतिनिधी राहुल चोपडे

नांदुरा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घर ते घर कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदा सूचनेतील तारखांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील निविदा सूचनेमध्ये ऑनलाइन निविदा सादर करण्यासाठी दि. २६/०८/२०२६ ते दि. ०६/०८/२०२६ अशी कालमर्यादा नमूद असल्याचे दिसून येते. म्हणजेच, वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध झाल्याच्या तारखेच्या तब्बल २० दिवस आधीच निविदा सादर करण्याची अंतिम मुदत संपलेली असल्याचे चित्र आहे.त्यामुळे ही निविदा सूचना प्रत्यक्षात कोणत्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आली? निविदेच्या अंतिम तारखा अचूक आहेत का? तारखांमध्ये मुद्रणाची अथवा प्रसिद्धीची चूक झाली आहे का? तसेच या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांना समान संधी मिळाली आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.नगरपरिषद प्रशासनाने या तारखांबाबत तातडीने अधिकृत स्पष्टीकरण देऊन मूळ निविदा सूचना, ई-टेंडर पोर्टलवरील प्रसिद्धीची तारीख व निविदा सादर करण्याची अंतिम तारीख स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तारखांमधील हा घोळ केवळ तांत्रिक त्रुटी आहे की निविदा प्रक्रियेतील गंभीर निष्काळजीपणा, याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *