
वनरक्षकावर हल्ला; शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव जामोद, प्रतिनिधी :
शासकीय कर्तव्य बजावत असताना वनरक्षकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सादिक रमजान सुरतने (वय 27 वर्षे) हे वनरक्षक म्हणून कार्यरत असून दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता ग्राम जामोद परिसरात शासकीय गणवेशात कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना आरोपी शेख फारुख शेख गफुर (रा. सितामाता परिसर, जामोद) हा खांद्यावर लाकडी चोप घेऊन जाताना दिसला.फिर्यादी यांनी पडताळणीसाठी आरोपीला थांबवून नाव व गाव विचारले असता, आरोपीने माहिती देण्यास नकार दिला. तसेच खांद्यावरील लाकडी चोप फिर्यादींच्या उजव्या खांद्यावर मारून त्यांच्यासोबत झटापट केली. यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून घटनास्थळावरून पसार झाला, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक 536/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 115(2), 352 व 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल माने (बकल नं. 702) यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख (बकल नं. 504) करीत आहेत.वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावताना झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
