नांदुराच्या जुन्या महामार्गावर झुडपांचे ‘साम्राज्य’रस्त्या वरही अतिक्रमण पादचाऱ्यांचा जीव धोक्यात

नांदुराच्या जुन्या महामार्गावर झुडपांचे ‘साम्राज्य’रस्त्या वरही अतिक्रमण, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात! काटेरी झुडपांनी पांढरी सीमारेषा ओलांडली; पायी चालण्या साठी जागाच शिल्लक नाही

नांदुरा, तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर )

दि. १० ऑक्टोबर २०२६ : नांदुरा शहराला बायपास मिळाल्या नंतर शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाची देखभाल दुर्लक्षित झाल्याचे चित्र समोर येत आहे. खामगाव व मलकापूर कडील महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पावसाळ्यात वाढलेल्या काटेरी झुडपांनी, गवताने आणि रान वनस्पतींनी अक्षरशः कब्जा केला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, झुडपांनी रस्त्याच्या कडेला असलेली पादचाऱ्यांची जागा गिळंकृत करून पांढरी सीमा रेषाही ओलांडली असून, काही ठिकाणी थेट डांबरी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पादचाऱ्यां साठीचा मार्ग झुडपांच्या घशात महामार्गाच्या कडेला चालण्या साठी जागाच उरली नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्या वरून चालावे लागत आहे. एका बाजूला भरधाव अवजड वाहनांची वर्दळ, तर दुसऱ्या बाजूला काटेरी झुडपांचे जाळे आणि साप-विंचवांचा धोका, अशा कात्रीत पादचारी सापडले आहेत. समोरून दोन्ही बाजूंनी वाहने आल्यास सुरक्षितपणे बाजूला होण्याचीही सोय राहत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. झुडपे हटविण्या साठी प्रशासन आणखी किती काळ वाट पाहणार? जुन्या महामार्गाच्या कडेला वाढलेल्या झुडपांनी रस्त्या लगतच्या जागेवर निर्माण केलेले हे अनधिकृत नैसर्गिक अतिक्रमण तातडीने हटविण्याची गरज आहे. संबंधित विभागाने महामार्गाच्या दोन्ही बाजूंची साफसफाई करून पादचाऱ्यां साठी सुरक्षित जागा मोकळी करावी, अशी मागणी होत आहे. झुडपांचे साम्राज्य संपणार कधी आणि नांदुरेकरांना निर्धास्तपणे चालता येणार कधी? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.जय महाराष्ट्र – जय हिंद.
अशोकराव घनोकार , नांदुरा .९७६३०५५०७१ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *