
धारगड यात्रेसाठी ३० तारखेपासून प्रवेश; भाविकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र धारगड येथे शिवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. धारगड येथील गुहेतील पवित्र शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.खटकाळी गेट येथून ३० तारखेला सकाळी 7 वाजेपासून प्रवेश सुरू होणार असून ३१ तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे.या कालावधीत दिवस-रात्र भाविकांना प्रवेशाची सुविधा राहणार आहे. टी-पॉइंटपर्यंत वाहनाने जाता येईल. त्यानंतर गुहेपर्यंत भाविकांना पायी जावे लागणार आहे.धारगड परिसर टायगर रिझर्व्ह क्षेत्रात येत असल्याने भाविकांनी वन विभाग व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद-बजरंग दल,अकोट व धारगड सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.परिसरात प्लास्टिक वापरास बंदी असल्याने प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणू नयेत. हार, फुले व प्रसादाचे साहित्य भाविकांनी आपल्या गावातूनच सोबत आणावे. दुचाकीसाठी ३० रुपये छोट्या चारचाकीसाठी ६० रुपये तर मोठ्या चारचाकी वाहनासाठी ७० रुपये शुल्क राहणार आहे.दरम्यान मागील २८ वर्षांपासून सुरू असलेली महाप्रसादाची परंपरा यंदाही कायम राहणार असून भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांनी परिसराची स्वच्छता राखून प्रशासन व वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन सेवा समितीने केले आहे.विश्व हिंदू परिषद-बजरंग दल अकोटधारगड सेवा समिती
