
अवघ्या दोन महिन्यांत सिमेंट रस्ते व नाल्यांची दुरवस्था; नगरपरिषदेच्या कामांवर नागरिकांचा संताप, जबाबदार कोण?
जळगाव जामोद प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील विकासकामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अवघ्या दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले सिमेंट रस्ते व नाल्या खराब होऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी सिमेंट उखडत असून रस्त्याची पृष्ठभाग खराब होत आहे. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यांमधून रेती व सिमेंट बाहेर पडत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहेत. काम पूर्ण होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच ही अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणताही अधिकारी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेला नाही किंवा चौकशी सुरू झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार, अभियंता आणि कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.
निवेदनात नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामे केल्याचा आरोप करत संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार, अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून शासनाच्या निधीचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“अवघ्या दोन महिन्यांत रस्ते उखडत आहेत, नाल्यांमधून रेती व सिमेंट बाहेर पडत आहे, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही. मग या निकृष्ट कामांसाठी जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.
