
दहीहंडा आणि कुटासा येथे सायबर जनजागृती मोहीम ठाणेदार गोपाल ढोले यांचे नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
महाराष्ट्र सायबर जनजागृती ऑक्टोबर २०२६ या विशेष उपक्रमांतर्गत, अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाढत्या डिजिटल गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दहीहंडा बस स्टॉप तसेच कुटासा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विशेष कॉर्नर मिटिंग्ज (कोपरा सभा) घेण्यात आल्या.दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांना सायबर फसवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सध्याच्या डिजिटल युगात होणाऱ्या ऑनलाईन बँकिंग फ्रॉड, फेक लॉटरी कॉल्स,सोशल मीडियावरील फसवणूक आणि सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लृप्त्या याविषयी त्यांनी नागरिकांना सतर्क केले.कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, तसेच आपला बँक खाते क्रमांक,एटीएम पिन किंवा ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका, असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी सायबर फसवणूक झाल्यास त्वरित मदत मिळण्यासाठी असलेल्या केंद्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० ची माहिती देण्यात आली.सायबर गुन्हा घडल्यास पहिल्या गोल्डन अवरमध्ये (गोल्डन तासात) या क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास फसवणूक झालेली रक्कम परत मिळण्यास मोठी मदत होते.असे ठाणेदार गोपाल ढोले यांनी स्पष्ट केले.नागरिकांना सुरक्षिततेच्या टिप्स सोप्या भाषेत समजण्यासाठी जनजागृतीपर माहिती पत्रकांचेही वाटप करण्यात आले.या दोन्ही ठिकाणच्या बैठकांना ज्येष्ठ नागरिकांसह ५० ते ६० ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
