जळगाव जामोदमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा? वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर नागरिकांचा रोष

जळगाव जामोदमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा? वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनावर नागरिकांचा रोष

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी

जळगाव जामोद : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, मारहाण, चाकू हल्ले. फसवणूक आणि विविध अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.पिंपळगाव काळे येथे केवळ मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेला जीवघेणा चाकूहल्ला हा तालुक्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा ताजा नमुना मानला जात आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.याच दरम्यान जळगाव जामोद शहरातील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राजा भर्तहरीनाथ मंदिर परिसरातील दुर्गा देवी मंदिरातून देवीच्या मूर्तीवरील अंदाजे ९०० ते १००० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या मुकुटाची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची चर्चा असताना, गुन्हा नोंदविताना त्याची किंमत अवघी ४,८०० रुपये दाखविण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. या घटनेमुळे तपास प्रक्रियेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुक्यात गुटखा विक्री, बनावट दारू विक्री तसेच जनावरांची बेकायदेशीर तस्करी यांसारखे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. अनेकांच्या मते, या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने संबंधितांचे मनोबल वाढत असून कायद्याचा धाक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतर अनेकदा तक्रारींची तातडीने दखल घेतली जात नाही. तक्रारदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, तर काही प्रकरणांमध्ये गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस वेळेवर पोहोचत नसल्याचाही आरोप होत आहे. तपासाची गती मंद असल्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा तत्काळ शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.रात्रीच्या वेळी शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस गस्तही अपुरी असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अनेक ठिकाणी केवळ औपचारिक गस्त घातली जात असल्याचा आरोप होत असून गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक ती कडक उपाययोजना होत नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.एकेकाळी समाजात ‘खाकी’चा असलेला दरारा कमी होत चालल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. वाढत्या चोऱ्या, हल्ले आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून कडक गस्त, प्रभावी तपास मोहीम आणि अवैध धंद्यांविरोधात निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि पोलीस प्रशासनावरील जनतेचा विश्वास पुन्हा दृढ व्हावा, यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *