
धानोरा महासिद्ध येथे अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी धानोरा महासिद्ध येथील ग्रामपंचायतीच्या जागेत श्रीकृष्ण श्रीराम वानखडे यांच्या घरासमोर अंदाजे ४ ते ५ फूट चौकोनी आकाराचा सिमेंट-विटांचा चबुतरा तयार करून त्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा अनधिकृतपणे बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले.याप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी राजेश त्र्यंबक व्यवहारे, वय ५१ वर्षे, यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्र. ५२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिंगाबर शालीग्राम हिवरकार (वय ३९), सुनिल सुरेश कुवारे (वय २८) आणि संदीप साहेबराव खुपासे (वय ४२), तिघेही रा. धानोरा महासिद्ध, यांच्याविरुद्ध BNS कलम ३२९(३), २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र पुतळ्यांच्या पावित्र्य भंगास प्रतिबंध अधिनियम, १९९७ मधील कलम ५२(१), ५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत. तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून छायाचित्रे घेण्यात आली असून, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच उपलब्ध CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच SDPO सोहन माछरे, पोलीस निरीक्षक सचिन बागुल आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.दरम्यान, या प्रकरणाबाबत नागरिकांनी अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित करू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
