वरखेडचे सुपुत्र इंजि. सचिन तायडे यांचा मंत्र्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने’ गौरव.

वरखेडचे सुपुत्र इंजि. सचिन तायडे यांचा मंत्र्यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने’ गौरव.

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित ‘अभियंता गौरव समारंभ-२०२६’ अंतर्गत राज्यभरातील अभियंते व कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा आज २९ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील सुपुत्र तथा सहाय्यक अभियंता श्रेणी-१ इंजि. सचिन निवृत्ती तायडे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २०२५-२६ या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या गौरव सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यामध्ये इंजि. सचिन तायडे यांचा समावेश आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (रस्ते) शरद ना. राजभोज, सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे, सचिव (म.रा.पा.सु.वि.म. मुंबई) गिरीश जोशी, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश भ. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पा. निगोट, सचिव राष्ट्रीय महामार्ग विभाग संतोष शेलार, सचिव प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता एकनाथ तळेले, जितेंद्र काळे, उपअभियंता प्रवीण पुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.लोकाभिमुख अभियंता म्हणून वेगळी ओळखइंजि. सचिन तायडे हे अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक जबाबदारी सक्षमपणे सांभाळतानाच लोकाभिमुख अभियंता म्हणूनही परिचित आहेत. नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते तत्परतेने कार्य करतात. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत, योग्य नियोजन, दर्जा आणि तांत्रिक पद्धतीने कामे पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे आणि विकासकामांच्या माध्यमातून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष बाब मानली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.अशा लोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या कार्यामुळे केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाला गती मिळत नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाची, अर्थातच शासनाची प्रतिमा जनमानसात अधिक उंचावण्यास मदत होते. शासनाच्या विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये शासनाच्या कामकाजाबद्दल सकारात्मक विश्वास व आपुलकीची भावना निर्माण होण्यासही हातभार लागतो.उपअभियंता संवर्गातून अत्यंत कमी वयात शासनाचा हा मानाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अभियंत्यांमध्ये इंजि. सचिन तायडे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार काम, नागरिकांच्या गरजा आणि ग्रामीण विकास यांचा समन्वय साधत केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.या गौरव सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागांतून सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. इंजि. सचिन तायडे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अभियंता सहकारी, मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मलकापूर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या पुरस्कार सोहळ्यावेळी इंजि. सचिन तायडे यांचे वडील तथा माजी सरपंच निवृत्ती तायडे, आई सौ. संगीता तायडे, पत्नी इंजि. सौ. कोमल सचिन तायडे तसेच त्यांच्या दोन्ही मुली सांचल व क्रांतीज्योती उपस्थित होत्या. शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा मानाचा पुरस्कार वरखेडच्या सुपुत्राला मिळाल्याने तायडे परिवारासह मलकापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *