
उल्लेखनीय कार्याबद्दल संरक्षण अधिकारी श्री. सुनील लाडूलकर यांचा विशेष सत्कार
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
दि. १५ ऑगस्ट २०२६ : अकोला जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये दाखल झालेल्या हरविलेल्या चार मूकबधिर बालकांची आधार नोंदणी करून त्यांच्या कुटुंबीयांचा व पत्त्यांचा शोध घेण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांना यश आले. या प्रयत्नांमुळे चारही बालकांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडणे शक्य झाले.बालकांच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला, मा. जिल्हाधिकारी, अकोला आणि मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या हस्ते चारही बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.बालकांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी करण्यात आलेल्या या संवेदनशील व उल्लेखनीय कार्याची अकोला जिल्हा प्रशासनाने विशेष दखल घेतली.भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अॅड. आकाशजी फुंडकर यांच्या हस्ते जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला येथील संरक्षण अधिकारी श्री. सुनील लाडूलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, जिल्हा परिषद अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनय नावंदर, पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध, पुनर्वसन आणि सुरक्षित पुनर्मिलन या कार्यात श्री. सुनील लाडूलकर यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे बाल संरक्षणाच्या क्षेत्रात संवेदनशीलता, तत्परता आणि जबाबदारीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
