
अवैध दारूविक्रीविरोधात आमखेड्यात
महिलांचा लक्षवेधी मोर्चा दारूविक्री तातडीने बंद करण्याची ग्रामपंचायतीकडे मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
गावामध्ये सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे महिला व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत आमखेडा गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढला. यावेळी महिलांनी गावातील अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली.गावातील अवैध दारुविक्रीमुळे सामाजिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून, याचा त्रास महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारूविक्रीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
- या मोर्चादरम्यान महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. गावातील अवैध दारुविक्री बंद करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला.या आंदोलनामुळे गावातील अवैध दारुविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
