परभणीतून मलकापूरकडे होणारी गोवंश वाहतूक उघड ८ जनावरे व बोलेरो पिकअप जप्त चालका विरुद्ध गुन्हा दाखल

परभणीतून मलकापूरकडे होणारी गोवंश वाहतूक उघड; ८ जनावरे व बोलेरो पिकअप जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर तालुका प्रतिनिधी

मलकापूर, दि. ३० सप्टेंबर :मलकापूर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह ८ जनावरे जप्त केली आहेत. या प्रकरणी चालकाविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी पहाटे मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना परभणी येथील कुरेशी मोहल्ल्यातून एक बोलेरो पिकअप वाहन गोवंश जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मलकापूर शहरातील भालगाव रोडवरील कुरेशी मोहल्ला परिसरात सापळा रचला.पहाटे सुमारे १२.४० वाजताच्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप (क्रमांक MH 03 CP 9946) वाहन दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये ८ गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने व निर्दयपणे कोंबून ठेवलेली आढळली. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही तपासात समोर आले.वाहन चालकाने आपले नाव मोहम्मद दानिश शेख जमील (वय २४ वर्षे), रा. वॉर्ड क्र. १०, मोताळा, ता. मोताळा, जि. बुलढाणा असे सांगितले. पोलिसांनी जनावरांच्या मालकीबाबत तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत.जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये गाय, वासरे व गोऱ्हे यांचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बोलेरो पिकअप वाहनाची किंमत ३ लाख रुपये असल्याने एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ०७२९/२०२६ नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५ व ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियम १९६० च्या कलम ११(१)(ड), ११(१)(ई), ११(१)(एफ) व ११(१)(एन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस कर्मचारी नवल नंदसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुपेश देविदास झालटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *