
दापुरी कालवे रस्त्यासाठी भारतीय दलित पँथरचे बेमुदत उपोषण.
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील दापुरी कालवे येथील दलित वस्तीच्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्त्यावर साचणाऱ्या चिखलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून संघटनेचे कार्यकर्ते अशोक गोपाळ कांबळे यांनी १३ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गट ग्रामपंचायत सोमठाणा अंतर्गत येणाऱ्या दापुरी कालवे वार्ड क्र. ३ मधील दापुरी फाटा ते मारोती मंदिरापर्यंतचा रस्ता हा दलित वस्तीचा मुख्य मार्ग आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचते. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. या प्रश्नी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अखेर अशोक कांबळे यांनी 10 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समिती मालेगाव यांना लेखी निवेदन दिले. मात्र मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आजपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या उपोषणाला गावातील नागरिक आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.उपोषणाच्या ठिकाणी शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
