
पोषणातून सुदृढ पिढी घडविण्याची जबाबदारी सर्वांचीच : विजय साठे दसरखेड येथे पोषण महाअभियान, नवचेतना आधारशिला कार्यक्रम उत्साहात; अंगणवाडी सेविकांकडून पौष्टिक आहाराचे प्रदर्शन.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : गरोदर माता, बालके आणि मातांच्या आरोग्याची काळजी घेत सकस आहार व योग्य मार्गदर्शनातून सुदृढ पिढी घडविणे ही सामूहिक जबाबदारी असून, अंगणवाडीच्या माध्यमातून पोषणाबाबत जनजागृतीचे काम प्रभावीपणे सुरू आहे, असे प्रतिपादन मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय साठे यांनी केले. दसरखेड येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २ येथे आयोजित पोषण महाअभियान व नवचेतना आधारशिला कार्यक्रमात ते बोलत होते.एकात्मिक बालविकास सेवा योजना, मलकापूर अंतर्गत नरवेल समूहातील समाविष्ट अंगणवाडी केंद्रांचा पोषण महाअभियान व नवचेतना आधारशिला कार्यक्रम दसरखेड येथे उत्साहात पार पडला. महिला व बालकल्याण विभागाच्या उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच माता-पालक वर्गाची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष विजय साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पोषण महाअभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका मीनाताई सुपे (नरवेल सर्कल), पर्यवेक्षिका सीमा कोलते (धरणगाव सर्कल), आरोग्य विभागाचे सीएचओ आझाद खान तसेच आरोग्य सेवक सुरळकर सर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना मीनाताई सुपे यांनी गरोदर माता व बालकांच्या आरोग्यासाठी पोषणाचे महत्त्व स्पष्ट केले. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून गरोदर मातांना सकस आहार, आरोग्यविषयक बाबी तसेच बालकांच्या संगोपनाबाबत सातत्याने मार्गदर्शन केले जाते, असे त्यांनी सांगितले.
पर्यवेक्षिका सीमा कोलते यांनी जन्मलेल्या बालकांचे योग्य संगोपन, बालकांना द्यावयाचा सकस व पौष्टिक आहार आणि त्यांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी पोषणाचा पाया मजबूत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या निमित्ताने नरवेल सर्कलमधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विविध प्रकारच्या सकस व पौष्टिक आहाराचे नमुने प्रदर्शनात ठेवले होते. उपस्थित माता-पालकांना या आहारातील पोषणमूल्यांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास नरवेल सर्कलमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.दसरखेड केंद्र क्रमांक २ येथील सेविका मंगला राजेश लांडे व सेविका मदतनीस मंगला शेले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. पोषण महाअभियानाच्या माध्यमातून माता व बालकांमध्ये आरोग्य आणि पोषणाबाबत जागृती निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सूत्रसंचालन जि प शिक्षक मोरे सर यांनी केले
