
मध्य प्रदेशातील प्रवाशांचा झोडगा बु.गावाजवळ अपघात
वाशीम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव)
मालेगाव–वाशिम मार्गावरील झोडगा बु फाटा परिसरातील डिलाईट हॉटेलजवळ मध्य प्रदेशातील प्रवाशांच्या कारला अपघात होऊन चौघे जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. अपघातातील जखमींना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, नारायण पाटीदार (४०, रा. संकल्पपूर, जि. धार), शुभम पाटीदार (४०, रा. गायपूर), कन्हैया ठाकूर (२३, रा. गायपूर) आणि शुभम ठाकूर (२५, रा. धार, मध्य प्रदेश) हे होंडा कंपनीच्या कारने मालेगावकडून वाशिमच्या दिशेने जात होते. त्यांची कार (क्रमांक एमपी १३ एएफ ८९२७) डिलाईट हॉटेलजवळील पुलाच्या दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मालेगाव पोलिसांना मिळताच हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले , डायल ११२ चे कर्मचारी निरंजन गुणलोवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी मालेगावच्या शासकीय रुग्णालयात रवाना केले. तसेच अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे कामही पोलिसांनी केले. दरम्यान, अपघातग्रस्त कार सीएनजीवर असल्याने त्यातून गॅसची गळती होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारी घेत सीएनजीचा कॉक बंद केला. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने वाहन रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी सीआरओ वाशिम तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेलाही घटनेची माहिती देण्यात आली. जखमींना कारमधून बाहेर काढण्यासाठी शिरपूर येथील सलीम रेगीवाले यांनीही मदत केली. तसेच मालेगाव तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दरम्यान, हे प्रवासी मध्य प्रदेशातील धार येथून तिरुपती दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे.
