अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त; पंचनामा न करताच तलाठी परतल्याचा आरोप सर्वांना समान मदत मिळेल म्हणत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?

अतिवृष्टीने शेत उद्ध्वस्त; पंचनामा न करताच तलाठी परतल्याचा आरोप, “सर्वांना समान मदत मिळेल” म्हणत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?

जळगाव जामोद | प्रतिनिधी

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस (पराठी), उडीद व मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे आडवी झाली असून, काही शेतांतील पिके पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.या नुकसानीची माहिती महसूल विभागाला देण्यात आल्यानंतर संबंधित तलाठी शेतात आले. मात्र, प्रत्यक्ष पिकांची पाहणी किंवा नुकसानीचा पंचनामा न करता केवळ शेतकऱ्याचा फोटो काढून ते शेतातून परत गेल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पिकांचे नुकसान प्रत्यक्ष दाखविण्याचा व आपल्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलाठी यांनी कोणतीही सविस्तर पाहणी केली नाही. उलट, “तहसीलदार साहेबांचा मेसेज आला आहे. सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची समान मदत मिळणार आहे,” असे सांगून पंचनामा न करताच ते निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक शेतातील नुकसान वेगवेगळ्या प्रमाणात झाले असून, प्रत्यक्ष पाहणी आणि पंचनामा केल्याशिवाय योग्य नुकसानभरपाई निश्चित होऊ शकत नाही. मात्र, कोणतीही पाहणी न करता सर्वांना समान मदत मिळेल, असे सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. पंचनाम्याविना नुकसानभरपाई मिळेल का, याबाबतही शेतकरी साशंक आहेत.शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त शेतांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत, प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. तसेच, पाहणी न करता परत गेल्याच्या आरोपांचीही चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *