
कौलखेड प्र. जामोद शिवारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
दि. ५ ऑगस्ट : जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड प्र. जामोद शिवारात रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करताना आढळून आलेल्या एका युवकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास पोहेकॉ रविकांत बावस्कार व चालक शेळके हे नियमित पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी निलेश लक्ष्मण खिरोडकर यांच्या गट क्रमांक २३ मधील शेत परिसरात एक व्यक्ती विनानंबरची मोटारसायकल घेऊन अंधारात संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली.सदर व्यक्तीने चेहऱ्यावर रुमाल बांधून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला नाव व पत्ता विचारला असता त्याने समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तो एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत असल्याचा संशय पोलिसांना आला.याप्रकरणी पोहेकॉ रविकांत बावस्कार यांच्या फिर्यादीवरून अविनाश दिलीप जाधव (वय ३२, रा. जळगाव जामोद) याच्याविरुद्ध कायम अप. क्र. ५००/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद पोहेकॉ विनोद मोरे यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ रविकांत बावस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
