जलंब येथे नाली सफाई व रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ग्रामपंचायतीला निवेदन अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

जलंब येथे नाली सफाई व रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ग्रामपंचायतीला निवेदन; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामपंचायत जलंब हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची साफसफाई व रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत जलंब प्रशासनाला निवेदन देण्यात आले.मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पादचारी, दुचाकीस्वार तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नालीची तात्काळ साफसफाई करून पाण्याचा योग्य निचरा करावा आणि खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आक्रमक शैलीत तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख, तालुकाध्यक्ष नितीश भावरकर तसेच तालुका उपाध्यक्ष रोहित भांबेरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.यावेळी शाखाध्यक्ष सम्यक महिंद्र शिरसाठ, शाखा उपाध्यक्ष रोहित सिंग राजपूत, शाखा सचिव संकेत धामणकार, प्रसिद्धी प्रमुख निखिल वाघमारे, सदस्य ऋषिकेश शिरसाट, सदस्य यश सावळे तसेच कोषाध्यक्ष श्रीकांत गव्हान्दे उपस्थित होते.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले असून, विकासकामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *