रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून साडेसहा लाखांची फसवणूक; बनावट जॉईनिंग लेटर देणाऱ्या आरोपीविरुद्ध जळगाव जामोद पोलिसांत गुन्हाजळगाव जामोद | प्रतिनिधी | दि. ५ ऑगस्टरेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट जॉईनिंग लेटर पाठवून एका शेतकऱ्याची तब्बल ₹6 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष प्रल्हाद जाधव (वय 38 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. आसलगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ब्रिजमोहन शंकरलाल सराटे (रा. कॅसिनोवा बिल्डिंग, रूम क्र. 14, संतोषी माता रोड, रामदासवाडी, साईबाबा मंदिरासमोर, कल्याण, जि. ठाणे) याच्याविरुद्ध कायमी गुन्हा क्र. 502/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3) व 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, आरोपीने रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे बनावट जॉईनिंग लेटर पाठवून वेळोवेळी ₹6,50,000 इतकी रक्कम स्वीकारली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.सदर फसवणुकीचा प्रकार दि. 15 सप्टेंबर 2024 ते दि. 19 जानेवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तपासातून समोर आले आहे. रेल्वेसारख्या प्रतिष्ठित शासकीय संस्थेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मा. पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या आदेशानुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.पोलीसांचे आवाहननोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया, अधिकृत संकेतस्थळ व कागदपत्रांची खातरजमा करावी. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
