
जळगाव जामोद महापुरातील मृताच्या कुटुंबाला मदत द्या; समाजवादी पक्षाचे प्रशासनाला निवेदन
प्रतिनिधी जळगाव जामोद सुरेंद्र गवई
दि. ३ ऑगस्ट : जळगाव जामोद शहरात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात मृत्यू झालेल्या सिद्धार्थ नगर येथील महादेव जगदेव वाघोदे यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शहरातील इतर पूरग्रस्त नागरिकांनाही शासनाच्या विविध योजनांमधून मदत मिळावी, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ३१ जुलै रोजी महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात पाय घसरून महादेव जगदेव वाघोदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई व मुलगा असा परिवार असून त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन हरपल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
या पार्श्वभूमीवर मृताच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच आमदारांच्या राखीव निधीतूनही विशेष आर्थिक सहाय्य देण्याची शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, तलावपुरा, वायतीवेस आणि राणी पार्क परिसरातील पूरग्रस्त नागरिकांचे पंचनामे करून त्यांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास समाजवादी पार्टी, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन समाजवादी पक्षाचे पदाधिकारी सै. नफीज सै. प्राफी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनाच्या प्रती आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्याधिकारी नगर परिषद जळगाव जामोद तसेच समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
