
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घ्यावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह
वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि. ३ ऑगस्ट (जिमाका) : सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै २०२६ होती.केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीही या योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, अशा शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्याबाबत किंवा सहभागी न होण्याबाबत अंतिम मुदतीच्या सात दिवसांपूर्वी संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे.बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र यासह अधिकृत बँक, सामाईक सेवा केंद्र (सीएससी) अथवा केंद्र शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून अर्ज सादर करून योजनेत सहभागी होता येईल.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला नाही, त्यांनी दि. १० ऑगस्ट २०२६ पूर्वी आपल्या पिकाचा विमा काढून मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.योजनेविषयी अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांक १४४४७, संबंधित विमा कंपनी अथवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वाशिम यांनी कळविले आहे.
