
प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच आवळला पतीचा गळा वाकळवाडी सुरेश झळके खून प्रकरण
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
पतीपत्नी चार सुखी संसार, विश्वासाचे नाते आणि जन्मोजन्मीची दिलेली वचने, वासना आणि अनैतिक प्रेमाच्या आडकाठी ठरणाऱ्या पतीच्या पवित्र नात्याचा शेवट हत्या करून कसा होतो, याची प्रचिती देणारा व मनसुन्न करणारा प्रकार मालेगाव तालुक्यात वाकळवाडी येथे ३१ जुलै रोजी उघडकीस आला आहे. पती हा आपल्या अनैतिक प्रेमातील सर्वात मोठा ‘काटा’ बनत आहे, हे पाहून पत्नीनेच स्वतःच्या प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजून आणि दोरीने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. *खरा प्रकार काय काय?* मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) हा तरुण गेल्या चार-पाच दिवसांपासून वाकळवाडी येथील आपल्या सासुरवाडीला गेला होता. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील सुनील चोंडकर यांच्या शेतात सुरेश याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार राजेश खेरडे आणि LCB प्रमुख सुधाकर आढे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतक सुरेश याच्या मृत्यूबाबत संशय बळावल्याने मालेगाव पोलिसांनी त्याची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळनाथ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खास शैलीत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. *असा रचला हत्येचा कट!* पती सुरेश आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नी आशा हिने प्रियकर महादेव याच्यासोबत मिळून पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. ३० जुलै रोजी संशयित आरोपींनी सुरेश याला बेसुमार दारू पाजली. तो नशेत पूर्णपणे असहाय्य झाल्यानंतर दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा घट्ट आवळून फाशी दिली आणि त्याची हत्या केली. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटेल अशा बेताने मृतदेह शेतात फेकून दिला. मालेगाव पोलीस स्टेशनच्या मेडशी आऊट पोस्ट मध्ये ही खबर मिळताच या पोलिस चौकीतून मालेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा ही हत्या सुरेश याच्या पत्नीने आपल्या प्रियकर महादेव याला सोबत घेऊन केल्याचे उघडकीस आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोखले, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहेत.
