
आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरात अष्टान्हिका पर्व उत्साहात साजरे
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
येथील श्री १००८ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरात अष्टान्हिका पर्व भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आनंदाने संपन्न झाले. या धार्मिक पर्वानिमित्त मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. मालेगाव जैन महिला मंडळाच्या सानिध्यात अष्टान्हिका पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अष्टान्हिका पर्व हे जैन धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण पर्व मानले जाते. या पर्वाच्या काळात भगवान जिनेंद्र देवांची भक्तिभावाने पूजा-अर्चना, अभिषेक, शांतिधारा, जिनवाणी श्रवण, स्वाध्याय तसेच विविध धार्मिक उपक्रमांमध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मंदिरातील भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. जैन महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. भक्तीभावाने करण्यात आलेल्या धार्मिक विधींमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळाले. यावेळी महिला मंडळाच्या सानिध्यात भक्तिगीते, धार्मिक स्तवन आणि जिनेंद्र भगवान यांच्या चरणी भक्तिभावाने आराधना करण्यात आली. अष्टान्हिका पर्वाच्या निमित्ताने आदिनाथ भगवानांच्या चरणी मंगलमय वातावरणात पूजा-अर्चना करून सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्यासाठी मंगलकामना करण्यात आली. जैन समाजातील महिला, पुरुष, युवक तसेच बालकांनीही मोठ्या उत्साहाने या धार्मिक पर्वात सहभाग नोंदवून धर्मलाभ घेतला. या पर्वामुळे मालेगाव शहरातील जैन समाजामध्ये धार्मिक एकोपा, संस्कार आणि अध्यात्मिक वातावरण अधिक दृढ झाले, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. अष्टान्हिका पर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन महिला मंडळ तसेच मंदिराशी संबंधित सर्व श्रावक-श्राविकांनी परिश्रम घेतले.
