
खांडवी येथे घरफोडी; रोख रक्कम व दागिन्यांसह १३.३५ लाखांचा ऐवज लंपास
जळगाव जामोद, प्रतिनिधी सुरेंद्र गवई :
तालुक्यातील खांडवी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत मोठी घरफोडी केली. या घटनेत रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ₹१३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत दिलीप कोल्हे (वय ३४, रा. खांडवी, ता. जळगाव जामोद) यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक ४८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) व ३०५(अ) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २५ जुलै २०२६ रोजी रात्री ११.३० ते २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ५.३० या कालावधीत घडली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून तसेच गावातील रहिवासी आदिनाथ बावस्कार यांच्या घराची कडी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही घरांतील कपाटे फोडून ₹२,२०,००० रोख रक्कम आणि ₹११,१५,००० किमतीचे जुने वापरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹१३,३५,००० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ, पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडीत तसेच पोलीस कर्मचारी विशाल माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व प्राथमिक तपासाची पाहणी केली.या प्रकरणाचा गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींचा तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध सुरू केला असून, या घरफोडीचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
