
उत्तररात्री आगीत चार दुकाने जळून खाक झाली.;शिरपूर येथील अग्नी तांडव
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
आज उत्तररात्रि भल्या पहाटे अंदाजे साडेतीन वाजता शिरपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार दुकानांना अचानक आग लागल्याने या घटनेत चार दुकाने जळून खाक झाल्याने या आगीच्या घटनेत सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शिरपूर येथील ढवळे विद्यालय समोर असलेल्या चार दुकानांना सकाळी साडेतीन ते चार वाजता दरम्यान अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रुद्र रूप धारण केल्याने चार दुकाने पूर्णपणे भस्मसात झाले. आगीची माहिती मिळतात शिरपूर पोलीस व गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मालेगाव रिसोड वाशिम येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मालेगाव येथील अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत आगीने मोठे नुकसान झाले. त्यातही अग्निशमन बंबा मध्ये पुरेशी पाणी नसल्याने अडचण आली. यावेळी पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी पुढाकार घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी व गावकऱ्यांची मानवी साखळी निर्माण करून बकेट, हंडे, प्लास्टिक कॅनचा साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे एका हॉटेलमध्ये असलेले गॅस सिलेंडर स्पोट होण्यापासून रोखण्यात यश आले. काही वेळाने वाशिम नगरपरिषद व रिसोड नगर परिषद चे अग्निशमन दलाचे वाहने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग पूर्णतः विझविण्यात यश आले. या घटनेत पत्रकार कैलास भालेराव यांचा मुलगा आकाश भालेराव याचे मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान चार ते पाच मोटरसायकली सह जळून खाक झाले. यामध्ये भालेराव याचे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले. बबन भांदुर्गे यांची चहाची हॉटेल गजानन गाभणे यांचे वॉटर फिल्टर प्लांट तर शेलगाव येथील मदन इंगोले नामक युवकाची कृषी साहित्य विक्रीचे दुकान पूर्णता जळाले. या घटनेत जवळपास ७० लाखाहून अधिक नुकसान झाल्याचे तलाठी पंचनाम्यातून स्पष्ट झाले. सदर आगीची घटना शॉक सर्किटने झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
