
शेतकऱ्यांचा पीक विमा, वीजपुरवठा व बनावट बियाण्यांच्या प्रश्नांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
मलकापूर | प्रतिनिधी : दिनेश आसटकार
दि. २१ जुलै : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मलकापूर तहसीलदारांना विविध शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. सन २०२५-२६ चा पीक विमा तात्काळ मंजूर करून पात्र शेतकऱ्यांना वितरित करावा, तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०२५-२६ चा पीक विमा अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नसून, विमा कंपन्या, शासन आणि प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रति हेक्टर ₹२९,८०० प्रमाणे पीक विम्याची रक्कम पात्र शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.याशिवाय निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :सन २०२५-२६ चा पीक विमा पात्र शेतकऱ्यांना तात्काळ द्यावा.शासकीय ज्वारी खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे.तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंगल फेज वीजपुरवठा २४ तास सुरू करावा.बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.वीजतार चोरीच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा.सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी.संघटनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.हे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटना, मलकापूरचे कार्यकर्ते सचिन शिंगोटे यांनी तहसीलदारांकडे सादर केले असून त्याच्या प्रती उपविभागीय अधिकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि तालुका कृषी अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
