
आसलगाव येथे वाढदिवसाला जाते असे सांगून निघालेली विद्यार्थिनी बेपत्ता; जळगाव जामोद पोलिसांत मिसिंगची नोंद
जळगाव जामोद, प्रतिनिधी सुरेंद्र गवई
तालुक्यातील वडशिंगी येथील 21 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायम मिसिंग क्र. 78/2026 अन्वये नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुही शहादेव तायडे (वय 21), रा. वडशिंगी, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा ही विद्यार्थिनी सोमवार (दि. 20 जुलै) रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास आसलगाव येथे मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून घरातून निघाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिचे वडील शहादेव दामाजी तायडे (वय 50) यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.बेपत्ता विद्यार्थिनीचा रंग गोरा असून उंची सुमारे 5 फूट 2 इंच आहे. घरातून निघताना तिच्या अंगात विटकरी रंगाचा पंजाबी ड्रेस, काळ्या रंगाची ओढणी व काळ्या रंगाच्या चप्पला होत्या. तिचे केस लांब असून उजव्या पायाच्या अंगठ्यावर जखमेची खूण असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायम मिसिंग क्र. 78/2026 नोंदविण्यात आली असून, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस कर्मचारी रविकांत बावस्कार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जळगाव जामोद पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
