राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक सत्रारंभ मार्गदर्शन जळगाव एज्युकेशन सोसायटी, जळगाव जामोद संचालित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय

राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक सत्रारंभ मार्गदर्शनदि. जळगाव एज्युकेशन सोसायटी, जळगाव जामोद संचालित श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय,

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ करिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना माहिती व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वरवट बकाल येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कोरडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी हे होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश निंबाळकर यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेचे महत्त्व तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊन समाजसेवा, नेतृत्वगुण, शिस्त, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित करण्याचे आवाहन केले.प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेंद्र कोरडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य “Not Me But You” (स्वतःपेक्षा समाज प्रथम), स्वयंसेवकांची भूमिका, नियमित उपक्रम, सात दिवसीय विशेष निवासी शिबिर, ग्रामविकास, स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन, रक्तदान, आरोग्य जनजागृती, मतदान जागृती, आपत्ती व्यवस्थापन तसेच व्यक्तिमत्त्व विकासामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व यावर सविस्तर विवेचन केले. त्यांनी स्वयंसेवकांनी समाजातील समस्यांची जाणीव ठेवून संवेदनशील, जबाबदार आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे नागरिक बनण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेतील अनुभव विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय कारकिर्दीतही अत्यंत उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. गिरीश मायी यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजाशी नाते दृढ करून सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये जोपासावीत, असे प्रतिपादन केले. राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रमांची मालिका नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविणारी प्रभावी चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे समन्वय व प्रास्ताविक प्रा. डॉ. निलेश निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. विनोद बावस्कर यांनी केले, तर प्रा. सौ. अर्चना जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. सौ. अर्चना जोशी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. गजानन वानखडे आणि श्री. समाधानजी निलजे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *