
छोट्या कब्रस्तानात पिण्याच्या पाण्याची सुविधा व कंपाऊंड वॉलच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे निवेदन; मागण्या न मानल्यास आमरण उपोषणाचा इशारा
जळगाव जामोद | प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या छोट्या कब्रस्तानात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आणि नियोजन सभापती सै. नफीज सै. शफीक यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती जळगाव जामोद यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कब्रस्तानात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अंत्यविधीसाठी व इतर धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कब्रस्तान परिसरात तातडीने बोअरवेल खोदून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय कब्रस्तानाला संरक्षक कंपाऊंड वॉल नसल्याने परिसराची निश्चित सीमा राहिलेली नाही. त्यामुळे अतिक्रमणाची शक्यता निर्माण होत असून कब्रस्तानाच्या पवित्रतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन मजबूत सिमेंट काँक्रीटची कंपाऊंड वॉल उभारण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यापूर्वीही प्रशासनाकडे या विषयावर निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दि. २० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या उपोषणाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनीही कब्रस्तानासारख्या धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
