
श्रीरामाच्या नावावर भ्रष्टाचार सहन करणार नाही. अयोध्येतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह
वाशीम जिल्हा प्रतिनिधी( अनिल जाधव)
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी मालेगाव येथे काँग्रेसच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम सत्याग्रह’ आंदोलन शांततेत पार पडले. या आंदोलनाला रिसोड- मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत लोकशाही मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनादरम्यान शहरातील येथील शिव चौकातील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करून देशात सत्य, पारदर्शकता आणि न्याय प्रस्थापित व्हावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशाच्या श्रद्धा, आस्था आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगितले. श्रीरामाच्या नावाचा वापर करून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार किंवा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न जनतेला मान्य नसल्याची ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली.अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शांततेत पार पडलेल्या या सत्याग्रहामुळे शहरात या आंदोलनाची मोठी चर्चा रंगली. धार्मिक श्रद्धा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेली भावना या आंदोलनातून अधोरेखित झाली.
