
मजुरीच्या वादातून सोनाळ्यात रक्तरंजित हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखलजखमींना अकोला येथे रेफर; नाकाचे हाड फ्रॅक्चर, पाच दिवसांनी पुन्हा उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला
संग्रामपूर प्रतिनिधी सुरेंद्र गवई
दि. १८ जुलै २०२६सोनाळा : संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे बांधकामावरील मजुरीच्या वादातून मिस्त्री कामगारावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमीवर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख ताज मोहम्मद शेख नसीर (वय ५८, रा. सोनाजी नगर, सोनाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा शेख नुर मोहम्मद उर्फ गुड्डू (वय ३२) हा मिस्त्री काम करतो. दि. १६ जुलै २०२६ रोजी संग्रामपूर येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम पूर्ण करण्याच्या कारणावरून संबंधित कामगारांमध्ये वाद झाला.यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता सोनाळा येथील खंडेलवाल सुपर मार्केट समोर शेख नुर मोहम्मद उभे असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, प्रथमेश धारपवार याने स्टीलच्या टिफिन डब्याने डोक्यावर व डाव्या डोळ्याजवळ जोरदार वार केला. तर गौरव धारपवार याच्यासह इतरांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.भांडण सोडवण्यासाठी गेलेले शेख जाकीर शेख शकूर (वय ४३) यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिक व पोलीसांनी हस्तक्षेप करून दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख नुर मोहम्मद उर्फ गुड्डू यांच्या डोक्याला, डाव्या डोळ्याजवळ तसेच चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.नाकाचे हाड फ्रॅक्चर; पाच दिवसांनी पुन्हा दाखल होण्याचा सल्लाजखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणीनंतर जखमीच्या नाकाचे हाड (Nasal Bone) फ्रॅक्चर असल्याचे सांगितले आहे. सध्या प्राथमिक उपचार करून रुग्णाला घरी सोडण्यात आले असून, पुढील विशेष उपचारासाठी पाच दिवसांनंतर पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात प्रथम खबर क्र. ०२०८/२०२६ अन्वये संतोष धारपवार, गौरव संतोष धारपवार, प्रथमेश संतोष धारपवार, विकास कांडेलकर, आकाश कांडेलकर, विलास धारपवार तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९(१), १८९(२), १९१(२) व १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बॉक्स”या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र संबंधित न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच जखमींचा अंतिम वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार गुन्ह्यात आणखी गंभीर कलमे वाढविण्याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.”— श्री. काळे, ठाणेदार, सोनाळा पोलीस स्टेशन
