बालाजी मंदिरातील चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा दोन आरोपींना अटक, चांदीचे दागिने जप्त

बालाजी मंदिरातील चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा; दोन आरोपींना अटक, चांदीचे दागिने जप्त

संग्रामपूर प्रतिनिधी सुरेंद्र गवई

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरातील चोरीचा तामगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे ५५० ग्रॅम चांदीचे दागिने व साहित्य, अंदाजे किंमत १ लाख २५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आले आहे.तामगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेड येथील फिर्यादी रंजनलाल सुखदेव चांडक यांनी १६ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. १५ जुलै रोजी सकाळी सुमारे ६.१० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बालाजी मंदिरातील रामदेव बाबा मूर्तीच्या चांदीच्या पादुका, चांदीचे छत्र व चांदीचा घोडा असा एकूण ५५० ग्रॅम चांदीचा ऐवज चोरी करून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे अमोल कुसमाकर रुठकर आणि जगननाथ सुरेश राठोड या दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक प्रियांशु जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रोहन माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात उमेश बोरसे, संदीप जाधवकर, योगेश सोनोने, आकाश आवारे, प्रमोद मिरे यांचा सहभाग होता.तामगाव पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मंदिरातील चोरीचा अवघ्या २४ तासांत उलगडा होऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *