विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ पुन्हा सक्रिय होणार मलकापूरकरां कडून स्वागत

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ पुन्हा सक्रिय होणार; मलकापूरकरांकडून स्वागत

मलकापूर | प्रतिनिधी : दिनेश आसटकार

शहरातील शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी दामिनी पथक पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयाचे मलकापूर शहरातील नागरिक, पालक व विद्यार्थिनींकडून स्वागत होत आहे.शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात वाढती वर्दळ, छेडछाडीसारख्या प्रकारांना आळा घालणे तसेच विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा दामिनी पथकाचा मुख्य उद्देश आहे. पथकाकडून शैक्षणिक संस्था, बसस्थानके, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त घालण्यात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तसेच विद्यार्थिनींना कायदेशीर हक्क, महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवावी याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. यामुळे महिला व मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.मलकापूर शहरातील पालक, शिक्षक व विविध सामाजिक संघटनांनी दामिनी पथकाचे काम अधिक प्रभावीपणे राबवून महिला सुरक्षेसाठी सातत्यपूर्ण उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थिनींना निर्भय आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *