
मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात आक्रोश मोर्चा; मुख्यमंत्र्यांना निवेदन
जळगाव जामोद | प्रतिनिधी सुरेंद्र गवई
सकल मातंग समाज, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. १७ जुलै २०२६) जळगाव जामोद येथे भव्य ‘मातंग समाज आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मोर्च्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, जळगाव जामोद यांच्या मार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करून अ, ब, क, ड या प्रवर्गांनुसार आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंडारे यांच्यावरील कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सोशल मीडियावर मातंग समाज आणि महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात महाराष्ट्रभर आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्यांची दखल घेऊन त्यांना आवश्यक संरक्षण द्यावे, अशीही मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
सकल मातंग समाजाने शासनाने समाजाच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
या निवेदनावर संजय बोडखे, राजेंद्रजी घोडे, कैलासजी खंडारे, बबनराव बोडखे, शांताराम तायडे, वामनराव बोरेसे, वामनराव गुढेकर, विजय सोनोने, कृष्णा नाटेकर यांच्यासह विविध समाज पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
