मलकापूर बसस्थानकावर पाण्याच्या बाटल्यांची अवैध विक्री तक्रारीनंतर कारवाईची मागणी

मलकापूर बसस्थानकावर पाण्याच्या बाटल्यांची अवैध विक्री तक्रारीनंतर कारवाईची मागणी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर: मलकापूर येथील बसस्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या निर्धारित दरापेक्षा जास्त किमतीत विकल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदार रामभाऊ खोडके (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ता. उप प्रमुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानकातील एका दुकानात पाण्याच्या बाटलीवर दर्शविलेल्या १५ रुपयांच्या किंमतीऐवजी २० रुपये आकारले जात आहेत. याबाबत विचारणा केली असता दुकानदाराकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.तसेच, संबंधित दुकानाकडे आवश्यक परवाना नसताना पाण्याच्या बाटल्यांची विक्री सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात अधिकृत ‘जनरल स्टोअर्स’ किंवा परवानाधारक विक्रेत्यांची स्पष्ट माहिती फलकाद्वारे दर्शविण्यात यावी, तसेच अवैध विक्री तात्काळ बंद करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित दुकानात अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला असून, याबाबतही सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *