
गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर यशस्वी – ७५ पेक्षा जास्त रक्तदात्यांचा सहभाग
जळगाव जामोद प्रतिनिधी
दिनांक 3 सप्टेंबर 2025 जळगाव जामोद:सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि सातपुडा गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.3 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात एकूण ७५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे शिबिर *रक्तदान हेच श्रेष्ठ दान* या तत्त्वावर आधारित होते आणि शिबिरला महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिबिर सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत सातपुडा शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आले होते.डॉ.बी.पी.ठाकरे मेमोरियल रक्तपेढी, अकोला यांच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलनाचे कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांचे आभार मानले.यावेळी, सातपुडा गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य आणि अंतिम वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करून शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदात्यांना मदत केली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. रक्तदात्यांनी केलेल्या या योगदानामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन भविष्यातही केले जाईल, असे आयोजकांनी सांगितले.
