
रील्स’च्या आहारी गेलेली तरुणाई,विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात,मानसोपचार तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
फक्त पाच मिनिटे म्हणत हातात घेतलेला मोबाईल तासनतास विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मौल्यवान वेळ हिरावून घेत आहे.मोबाईल, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओंच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि मानसिकतेवर अत्यंत विपरीत परिणाम होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.गेल्या दहा वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी शिक्षिका व ‘संस्कार द इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट’च्या संस्थापक मयुरी रविंद्र गोळे यांनी याबाबत अत्यंत चिंताजनक निरीक्षणे नोंदवली आहेत.शिक्षिका मयुरी गोळे यांनी वर्तवलेली प्रमुख निरीक्षणे आणि धोके एकाग्रतेचा अभाव: सतत शॉर्ट व्हिडिओ आणि रील्स पाहिल्यामुळे मुलांचे लक्ष वारंवार विचलित होते.अभ्यासासारख्या संयम आणि सातत्याची गरज असलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जात आहे.मानसिक आजार व चिडचिड: काही वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आजच्या मुलांच्या दैनंदिन वर्तनात मोठा बदल झाला आहे.मुलांमध्ये चिडचिड, अस्थिरता आणि एकाग्रतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.• डिजिटल उत्तेजना (Digital Stimulation): सततच्या डिजिटल स्क्रीनमुळे मुलांना शांतपणे एखाद्या विषयावर विचार करण्याची किंवा लक्ष केंद्रित करण्याची सवय कमी होत चालली आहे.कौटुंबिक वातावरणावर परिणाम: मोबाईलचा अतिवापर केवळ अभ्यासापुरता मर्यादित न राहता, त्याचे दुष्परिणाम आता कौटुंबिक वातावरणावरही दिसू लागले आहेत. पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केल्यास मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिड आणि वाद घालण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.मोबाईल हे शिक्षणाचे एक चांगले साधन ठरू शकते, मात्र त्याचा अनिर्बंध वापर विद्यार्थ्यांच्या विकासातील मोठा अडथळा ठरत आहे. यावर मात करण्यासाठी पालकांनी मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घालणे अत्यंत गरजेचे आहे.मुलांचा वेळ अभ्यास, खेळ, वाचन आणि संवाद अशा सर्जनशील उपक्रमांमध्ये कसा गुंतवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता घर आणि शाळा या दोघांनीही संयुक्तपणे प्रयत्न करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे.
