
चांगले पुस्तकं वाचले की ज्ञानदेव प्रसन्न होते,विठ्ठल कुलट*( एपीजे अब्दुल कलाम जयंती निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन )
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
एपीजे अब्दुल कलाम यांची परिस्थिती गरिबीची होती.कामधंदा करून गावातील शाळेत ते शिकलेत.ते जागेपणी मोठे स्वप्न पाहत आणि जिद्दीने साकार करत.ज्ञान हाच देव आहे आणि तो नित्य चांगले वाचन व चांगले काम केले की, प्रसन्न होतो,यावर त्यांचा दृढ विश्वास होता.म्हणून आपण सुद्धा ज्ञानाच्या देवाला प्रसन्न करण्यासाठी नेहमी चांगल्या पुस्तकांचे वाचन करत राहिले पाहिजे,असे विचार प्रसिद्ध कवी विठ्ठल कुलट यांनी व्यक्त केले.पि एम श्री जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा,बोर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी डॉ.एपिजे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करताना विठ्ठल कुलट यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरां द्वारा संवाद साधला.कविता,कथा,लेख इत्यादी लिहिण्यासाठी आपले वाचन-श्रवण चौफेर असले पाहिजे,हे त्यांनी उदाहरणासहित सांगितले. याप्रसंगी त्यांनी स्त्री-पुरुष समानता,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रभक्ती, विशेषत्वाने स्त्रीयांचे समाजातील स्थान, त्यांच्या प्रगतीला बाधक ठरणाऱ्या समाजातील अनिष्ट चालीरीती, परंपरा तसेच विद्यार्थ्यांनी बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार का करावा ? विज्ञानवादी का बनावे ? याबाबत सखोल असे मार्गदर्शन करताना डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाकरिता केलेल्या महत्तम कार्याचा,त्यांच्या निष्पृह व्यक्तिमत्वातील अनेक गोष्टींना उजाळा दिला.सध्याची शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती,शिक्षणाचे महत्त्व,भाकड कथा,अंधश्रद्धा निवारण,परिस्थितीचा सामना करण्याचा आत्मविश्वास इत्यादी विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर केल्यात.उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांना कविता कशी तयार करावी ? लेखन कसे करावे? आपणाला कविता कशी सुचते ? आपण कधी पासून कविता करता? याबाबतीत विविध प्रश्न विचारले.तितक्याच आपुलकी व जिव्हाळ्याने तसेच बोर्डी येथील शाळेच्या सर्वांगीण प्रगतीची मुक्तकंठाने प्रशंसा करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांची मने जिंकलीत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश चोरे यांनी,सूत्रसंचालन कु.शर्वरी राजगुरू,कु.तन्वी खिरकर यांनी तर आभार कु.खुशी अवचार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सतिश धांडे,रामदास पंधरे,नितीन मासोदकर,विनोद तळोकार,कु. लता पुराम,कु,माया लायबर, कु.रागिनी खोटरे,शालेय कर्मचारी निलेश राजगुरू,रुपाली राजगुरू यांनी सहकार्य केले.
