‘नकारातून संधी वाचनातून प्रेरणा,मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांचा दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र,गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव आणि बालवाडीतील चिमुकल्यांना गणवेश वाटप

‘नकारातून संधी वाचनातून प्रेरणा,मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांचा दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र,गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव आणि बालवाडीतील चिमुकल्यांना गणवेश वाटप

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.शशिकांत बाबर (म.श.प्र.से.) यांनी ‘एक वर्ग असा ही’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत PM SHRI नगर परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र. ५, अकोट येथे दुसऱ्यांदा भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचा विशेष वर्ग घेत जीवनात सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, शिक्षणाचे महत्त्व आणि यशासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन
१५ ऑक्टोबर हा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.नो म्हणजे ‘Next Opportunity नकारातून संधी शोधण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शशिकांत बाबर यांनी नो या शब्दाचा अर्थ ‘Next Opportunity’ अर्थात पुढील संधी असा समजावून सांगितला.नकार किंवा अपयशामुळे निराश न होता त्यातून नवी संधी शोधावी आणि आत्मविश्वासाने पुढे जावे, हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
गुणवंत विद्यार्थिनी माहिरा परवीन हिचा गौरव
शाळेच्या शैक्षणिक यशात भर घालणारी अभिमानास्पद बाब म्हणजे इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी माहिरा परवीन मोहम्मद खालिद हिची इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत निवड झाली.या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला प्रोत्साहन देण्यात आले.माहिराचे हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.
स्वखर्चातून बालवाडीचा उपक्रम; चिमुकल्यांना गणवेश वाटप
पी एम श्री नगर परिषद उर्दू शाळा क्र.५ येथे स्वतःच्या खर्चातून बालवाडी चालविण्यात येत असून,या बालवाडीत सुमारे ४० चिमुकले शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवत आहेत.शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या पुढाकारातून या सर्व बालवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्यात शाळेविषयी आपुलकी निर्माण करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.
एक वर्ग असा ही’ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी पाऊल
अकोट नगर परिषदेच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे,त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासाला चालना देणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या या दुसऱ्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.कार्यक्रमाची प्रस्तावना माननीय प्रशासन अधिकारी तेजस हागोने यांनी केली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मोहम्मद शाकीर सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक असलम खान यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, गुणवंतांचा गौरव करणे आणि चिमुकल्यांच्या शिक्षणाला बळ देणे,या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवी उमेद मिळाली तर शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *