डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमाबाबत जनजागृती

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमाबाबत जनजागृती


अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट येथे भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न व थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या अभिनव उपक्रमांतर्गत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एच.पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा PDKV Research & Incubation Foundation,अकोला यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा राष्ट्रनिर्मितीतील अमूल्य योगदानाचा आणि युवकांना प्रेरणा देणाऱ्या विचारांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.आर.इंगळे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ.कलाम यांचे प्रेरणादायी जीवनकार्य,वैज्ञानिक दृष्टिकोन,संशोधन व नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले.तसेच विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रा.एम.आर.राजपूत,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज महाराष्ट्र झोन’ या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.समाजातील विविध समस्यांवर नावीन्यपूर्ण,तंत्रज्ञानाधारित व व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.तसेच स्पर्धेची उद्दिष्टे,सहभागाची पात्रता,नोंदणी प्रक्रिया,नावीन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण,निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता,उद्योजकता व संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमास डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रा.सागर पाटील अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.यू.टी.भाटी,डॉ.ए.आर.चौधरी,प्रा.शिवतेज पोटे व प्रा. नितेश इलामे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी चंचल धुवे,पूजा नराजे,ईश्वरी कोल्हे,साक्षी किन्हीकर व शिवानी वानखेडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच बी.ए.व बी.एस्सी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *