
सोलर मंजूर, पैसे भरले; तरीही पंप बसविण्यात टाळाटाळ पावसाने दगा दिला, आता सोलर कंपनी-महावितरणच्या दिरंगाईचा फटका; हळद, सोयाबीन वाळण्याच्या मार्गावर
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव):
पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आधीच संकटात असताना आता शासनाच्या सोलर योजनेतील कार्यालयीन दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे. सोलर मंजूर होऊन दोन-तीन महिने उलटले, आवश्यक कागदपत्रे व रक्कमही भरली; मात्र प्रत्यक्ष शेतात सोलर पंप बसविण्यास संबंधित यंत्रणा अपयशी ठरली आहे. परिणामी सिंचनाअभावी हळद, सोयाबीनसह अन्य पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.‘मागेल त्याला सोलर’ योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रे व रक्कम भरली. मात्र, त्यानंतर सोलर कंपनीकडून प्रत्यक्ष कामाला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयापासून सोलर कंपनीच्या कार्यालयापर्यंत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.अमानी येथील शेतकरी राजू भीमराव गवळी व अनिल गंगाराम जाधव यांनी ओसवाल कंपनीकडे सोलरसाठी अर्ज करून आवश्यक रक्कम भरली. मात्र दोन महिने उलटूनही त्यांच्या बोअरवेलवर सोलर पंप बसविण्यात आलेला नाही. पाऊस नसल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या शेतातील हळद, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव व शेतकरी राजू गवळी यांनी १५ सप्टेंबर रोजी वाशीम येथील महावितरण मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची व्यथा मांडत ‘पात्र शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप बसवून द्या’ अशी मागणी करण्यात आली.अधीक्षक अभियंता दरवडे यांनी तत्काळ संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्ही. बी. चव्हाण तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात दोन दिवसांत सोलर बसविण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.दरम्यान, ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनीही दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्येबाबत विचारणा केली.‘पैसे मागितले तर थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार करा!’सोलर बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी अधीक्षक अभियंता दरवडे यांच्याकडे केली. यावर ‘ज्यांनी पैशांची मागणी केली असेल, त्यांची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून कारवाई करा,’ असे दरवडे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे जाधव यांनी नमूद केले.शेतकऱ्यांचा संताप‘योजना आमच्यासाठी, पैसे आमच्याकडून घेतले; मग सोलर बसविण्यासाठी एवढ्या चकरा का?’ असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. पिके डोळ्यादेखत वाळत असताना कार्यालयीन दिरंगाई सुरूच राहिली, तर शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून देणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.जाधव यांची ठाम मागणीमंजूर होऊनही सोलर पंपापासून वंचित असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या शेतात तात्काळ सोलर पंप बसविण्यात यावेत. महावितरण व संबंधित सोलर कंपन्यांनी दिरंगाई न करता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे.
