पळशी झाशीतील POCSO कायद्यातील आरोपीस जामीन मंजूरखामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

पळशी झाशीतील POCSO कायद्यातील आरोपीस जामीन मंजूरखामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या श्याम मारवदे या युवकास खामगाव येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा आरोपीने पाठलाग करून तिला रस्त्यात अडविले. यावेळी ‘आज तुझा वाढदिवस आहे, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणले आहे, तू हे चॉकलेट घे,’ असे आरोपीने म्हटल्याचा आरोप आहे. मात्र, त्याचवेळी अल्पवयीन मुलीचा काका तेथे येत असल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी तामगाव पोलीस स्टेशन, ता. संग्रामपूर येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम 78 तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO Act) कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर तामगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीच्या भावाकडून गुन्ह्यात वापरण्यात आल्याचे सांगितलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली.आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दिनांक 16 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदर गुन्हा आपल्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला असून आरोप मान्य नसल्याचे सांगत आरोपीने जामिनासाठी खामगाव येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली.आरोपीच्या वतीने ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ ॲड. विद्यासागर अलोने यांनी जामीन अर्ज सादर केला. सदर अर्जावर पोलिसांना तसेच पीडित अल्पवयीन मुलीस त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या. पोलिसांनी तसेच पीडितेने आरोपीस जामीन देऊ नये, अशा आशयाचे म्हणणे न्यायालयासमोर सादर केले.दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून आरोपी श्याम मारवदे यास काही अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला.सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड.विद्यासागर अलोने, ॲड. प्रणव नाफडे, ॲड. उदय कपले व ॲड. अनंता कानोळजे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *