
आजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ तायडे परिवाराचा सेवाभावी संकल्प पूर्ण
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
सामाजिक बांधिलकी जपत आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत ठेवण्याचा आदर्श वरखेड येथील तायडे परिवाराने घालून दिला आहे. प्रभावती तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचे उद्घाटन नातसून कोमलताई तायडे यांच्या हस्ते पार पडले.३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने प्रभावती रामभाऊ तायडे यांचे
निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पारंपरिक पद्धतीने मोठा खर्च करून तेरवीचा कार्यक्रम करण्याऐवजी, तो खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पिण्याचे
पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने पाण्याची टाकी, आरओ वॉटर फिल्टर आणि चिलर प्लांट उभारला. आजी प्रभावती तायडे यांना शिक्षणाविषयी विशेष आस्था होती. त्यांचे कुटुंबीयही
शिक्षण आणि सामाजिक कार्याशी जोडलेले आहेत. आजींच्या स्मृती जपताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना साजेसा असल्याची भावना व्यक्त होत आहे. या सुविधेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी रामधन धुरंधर, बाबुराव वानखेडे, तेजराव तायडे, राम तायडे, विनोद वानखेडे, शिक्षक दाते, घोंगटे, शिक्षिकापरिहार यांच्यासह गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळी उपस्थित होती.
