
जळगाव जामोद तालुक्यात शेतातील सौर कृषिपंपाची मोटार चोरीला!धनोऱा परिसरातील घटना; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार,
प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगाव जामोद : तालुक्यातील धनोऱा परिसरात शेतातील सौर कृषिपंपाची मोटार व त्यासंबंधित साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेतकरी नागेशराव काशीराम चंदनकर यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अदखलपात्र गुन्हा अहवालाची (एनसीआर) नोंद केली आहे.तक्रारीतील माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याची धनोऱा शिवारातील गट क्रमांक ३७५ मध्ये सुमारे चार एकर शेती आहे. या शेतात उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी महावितरणच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ अंतर्गत पाच अश्वशक्तीचा (५ एचपी) सौर कृषिपंप बसविण्यात आला होता.दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता शेतातून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात गेल्यावर विहिरीतील पाण्याची मोटार, हेड व संबंधित साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विहिरीतील पाईप कापून पडल्याचेही तक्रारीत नमूद आहे. परिसरात पाहणी करूनही साहित्य आढळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.चोरीस गेलेल्या सौरपंपाच्या मोटार व हेडला जोडलेल्या केबलसह इतर साहित्याची अंदाजे किंमत ४ हजार ९०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतातील सिंचन व्यवस्थेचे नुकसान झाले असून, शेतीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा अहवालाची नोंद करण्यात आली आहे. शेतातील सौर कृषिपंप व शेतीसाठी आवश्यक साहित्य सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.शेतकऱ्यांनी शेतातील विद्युत उपकरणे, सौरपंप व इतर मौल्यवान साहित्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.
