अकोटमधील कॅफे, बंदिस्त केबिन व लॉजची कायदेशीर तपासणी करा

अकोटमधील कॅफे, बंदिस्त केबिन व लॉजची कायदेशीर तपासणी करा!अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाचे पोलिसांना निवेदन

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील कॅफे, बंदिस्त केबिन तसेच लॉजेसची कायदेशीर तपासणी करून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद–बजरंग दल, अकोट प्रखंडाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.अकोट शहरात शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफे, पडदे लावून तयार केलेल्या बंदिस्त केबिन आणि लॉजिंग व्यवसायांची कायदेशीर परवानगी, नियमांचे पालन व सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ तसेच इतर लागू कायद्यांच्या तरतुदींनुसार अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. संबंधित आस्थापनांमधील अभ्यागत नोंदी, ओळखपत्र पडताळणी, सीसीटीव्ही व्यवस्था आणि आवश्यक परवान्यांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन किंवा गुन्हा आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.तसेच, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील लॉजेसना लागू असलेल्या नियमांची व परवानग्यांची पडताळणी करून पोलीस प्रशासन, नगर परिषद आणि बालसंरक्षण यंत्रणेच्या संयुक्त पथकामार्फत अचानक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.या कारवाईदरम्यान कोणत्याही अल्पवयीन बालकाची ओळख उघड होणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंतीही निवेदनातून करण्यात आली.या वेळी विश्व हिंदू परिषद–बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, अकोला, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोट, मुख्याधिकारी, अकोट नगर परिषद, जिल्हाधिकारी, अकोला तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अकोला यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *