
अमृत योजनेअंतर्गत मालेगाव येथे उद्योजकता विकास कार्यक्रमास सुरुवात
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव):
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने मालेगाव येथे १० दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात झाली. मालेगाव येथील उद्योजक अभिषेक मुंदडा यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी मान्यवरांचा अमृत संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अमृत मित्र नंदकिशोर वनस्कर, शैलेंद्र कळसे, हरिहर पांडे, नवल महाराज शर्मा तसेच प्रशिक्षक प्रा. कैलास खासभागे आदी उपस्थित होते.उद्घाटनानंतर अमृत मित्र नंदकिशोर वनस्कर यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. राज्यातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे तसेच रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.या १० दिवसीय प्रशिक्षणामध्ये ४ दिवस ऑफलाईन आणि ६ दिवस ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षक प्रा. कैलास खासभागे यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना, ‘अमृत पेठ बाजारपेठ’ तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सविस्तर माहिती दिली. यासोबतच जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचीही माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी एकूण १० लाभार्थींनी नोंदणी करून सहभाग घेतला आहे.अमृत संस्थेचा लक्षित गटमहाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.अमृत संस्थेच्या विविध योजना व प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क : 9112227634 संकेतस्थळ : www.mahaamrut.org.in संपर्क साधावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी केले आहे.
