
शिक्षक दिनानिमित्त श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात स्वयंशासन उत्साहात संपन्नविद्यार्थ्यांनी एक दिवस सांभाळले प्राचार्य, पर्यवेक्षक, अधीक्षकांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पदभार
जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई
शिक्षक दिनाच्या औचित्याने श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद येथे ९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘स्वयंशासन दिना’चे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रशासन आणि अध्यापनाची जबाबदारी प्रत्यक्ष स्वीकारत एक दिवस प्राचार्य, पर्यवेक्षक, अधीक्षक, लिपिक, शिक्षक व शिपाई अशा विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. स्वयंशासनाच्या या उपक्रमात प्राचार्य, अधीक्षक, पर्यवेक्षक, लिपिक, शिक्षक व शिपाई आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या एकूण ५४ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी, पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वयंशासनांतर्गत प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणारी विद्यार्थिनी लक्ष्मी पवार व पर्यवेक्षकपदाची जबाबदारी पार पाडणारी विद्यार्थिनी पूनम दाते यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रा. राजीव देवकर यांनी स्वयंशासन उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी प्रशासन व अध्यापनाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.*विद्यार्थ्यांनी सांभाळली विविध पदांची जबाबदारी*स्वयंशासनांतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाची धुरा अत्यंत उत्साहाने सांभाळली. अधीक्षक म्हणून पुनम जवंजाळ, तर लिपिक म्हणून रेवती देवकर व प्रतीक्षा जुमडे यांनी जबाबदारी पार पाडली. शिपाई म्हणून हर्षद गायकवाड, प्रज्वल भारसाकडे, साजिद शाह, मिलिंद तायडे, तुषार वानखडे व राज वाघ यांनी काम पाहिले.शारीरिक शिक्षणाच्या जबाबदारीचे काम सांभाळताना आँचल वारे या विद्यार्थिनीने सूचना देत सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत घेऊन कार्यक्रमातील शिस्तबद्ध वातावरण कायम ठेवले. या उपक्रमांतर्गत ३९ विद्यार्थिनी व ३ विद्यार्थी अशा एकूण ४२ विद्यार्थ्यांनी विविध विषयांच्या शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षकाच्या भूमिकेतून विषय मांडताना अध्यापन कौशल्य, संवादकौशल्य, वेळेचे नियोजन आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.*‘आजचा दिवस खूप काही शिकवून गेला’*समारोपीय कार्यक्रमात स्वयंशासनांतर्गत विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. प्रतिभा राठोड, वैष्णवी मऱ्हे, रेणुका जवंजाळ, लक्ष्मी माठे, गौरी काटे, पूनम भटकर, रेवती देवकर, सारिका वारे, गायत्री श्रीनाथ, उन्नती कवळे, पूनम जवंजाळ, पूनम दाते, लक्ष्मी पवार व अभिषेक वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.प्रशासन आणि अध्यापनाची जबाबदारी पार पाडताना सुरुवातीला आलेले दडपण, त्यानंतर मिळालेला आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष कामातून मिळालेली शिकवण यांचा विद्यार्थ्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘आजचा दिवस आम्हाला खूप काही शिकवून गेला. शिक्षक व प्रशासनातील विविध पदांची जबाबदारी किती महत्त्वाची असते, याची प्रत्यक्ष जाणीव झाली,’ असे विद्यार्थ्यांनी सांगितले. *विद्यार्थ्यांना नेतृत्वाची नवी दिशा*समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश मायी होते. यावेळी मंचावर अधीक्षक संजय गाडेकर, पर्यवेक्षक प्रा. जी. एस. वानखेडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राजीव देवकर, प्रा. ऋषिकेश कांडलकर व प्रा. रामेश्वर सायखेडे यांची उपस्थिती होती.यावेळी प्राचार्य डॉ. गिरीश मायी, प्रा. जी. एस. वानखेडे, संजय गाडेकर व प्रा. राजीव देवकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वयंशासनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभवातून जीवनकौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमासाठी प्रा. रामेश्वर सायखेडे व प्रा. गणेश जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. ऋषिकेश कांडलकर व प्रा. सचिन उनडकाट यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन तसेच चित्रीकरणाची जबाबदारी पार पाडली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, तसेच समाधान निलजे, बाबुराव चव्हाण, गजानन वानखडे, मानसी कुलकर्णी, हर्षद धर्मे यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर सायखेडे यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश जोशी यांनी केले.विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षक व प्रशासकीय पदांची जबाबदारी स्वीकारून घेतलेला हा अनुभव त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबरोबरच भावी व्यावसायिक आणि सामाजिक जीवनासाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
